Sunday, March 11, 2018

... तर पारनेरमध्ये ‘बच्चू कडू’ तयार झालाच म्हणून समजा!

निलेश लंके हे निमित्त | लंकेंनी नव्हे, तरुणाईने प्रस्थापितांना आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडले | ‘गृहीत’ धरण्याच्या वृत्तीला हंग्यात मिळा...


प्रस्थापित राजकीय घराणी आणि त्यांची सामान्यांना गृहीत धरण्याची वृत्ती याविरोधात जनतेच्या मनात किती संताप आणि चिड आहे याचे प्रत्यंतर म्हणजे निलेश लंके यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला जमलेला अफाट जनसमुदाय! व्यासपीठावर होते कोण? अगदीच सामान्य कार्यकर्ते आणि तरुण. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या एकापाठोपाठ झालेल्या दोनही सभांपेक्षा जास्त जनसमुदायाची उपस्थिती लंके यांच्या समर्थनार्थ होती. कोणीही सेलिब्रिटी अथवा करमणुकीसाठीचा कोणताही कार्यक्रम नसतानाही ‘निलेश लंके’ या सामान्य व्यक्तीसाठीची ही उपस्थिती फक्त आमदारांनाच नव्हे तर सर्वच राजकीय पक्षांच्या कथीत नेते आणि प्रस्थापितांना आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडणारी ठरली.
सामान्य जनता आणि विशेषत: तरुणांची ताकद, त्यांच्या मनात प्रस्थापितांच्या विरोधात असणारी चीड, नाराजी किती प्रमाणात आहे हे हंग्यात निलेश लंके यांच्या वाढदिवसाच्या सोहळ्यात अधोरेखीत झाले. उद्धव ठाकरे यांच्या पारनेरमधील कार्यक्रमानंतर निलेश लंके यांच्या विरोधातील सेनेंतर्गत हालचाली गतीमान झाल्या आणि त्यानंतर लंके यांचे तालुका प्रमुख पद काढून टाकण्यात आले. नव्या तालुका प्रमुखाची घोषणा होताच लागलीच शिवसैनिकांच्या भावनांचा उद्रेक झाला आणि सोशल मिडियातून लंके यांच्या समर्थनार्थ ‘पोस्ट व्हायरल’ झाल्या. दोन दिवसांवर लंके यांचा वाढदिवस आला असताना त्यांची झालेली हकालपट्टी सैनिकांसह लंके यांच्याही जिव्हारी लागली. वाढदिवशी शक्तीप्रदर्शन करण्याचा चंग समर्थकांनी बांधला आणि तो अफाट यशस्वी झाला. सुजित झावरे यांच्यासाठी वासुंदे येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आणि त्यानंतर आ. विजय औटी यांच्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली. या दोन्ही सभांसाठी त्या-त्या पक्षांचे अध्यक्ष आले असतानाही निलेश लंके या सामान्य कार्यकर्त्याच्या वाढदिवसाला कोणीही सेलिब्रिटी नसताना तरुणांसह महिलांनी लावलेली हजेरी नोंद घेणारी आणि  कथीत नेत्यांना आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडणारी आहे.
निवडणुकांना बराच कालावधी बाकी आहे. निलेश लंके यांची तोपर्यंत हा ‘टेम्पो’ टिकविण्याची मोठी कसोटी लागणार आहे. किती गर्दी जमते हे पाहण्यासाठी काहीजण आले, राष्ट्रवादीने मुद्दाम आपले कार्यकर्ते, समर्थक लंके यांच्या मेळाव्याला पाठविले, राज ठाकरेंच्या सभेलाही गर्दी जमते, अशा प्रतिक्रिया लंके यांच्या विरोधकांनी सोशल मिडियावर नोंदविल्या. त्या काही प्रमाणात खर्‍या असल्या तरी राज ठाकरेंना लोक ऐकण्यासाठी येतात अन् इथे लंके यांचे वक्तृत्व किती हे सर्वश्रूत आहे. परंतू, असे असले तरी त्यांनी त्यांच्या छोटेखानी भाषणात ‘तालुक्यात बरेच जण कार्यक्रम घेतात आणि व्यासपीठावर त्यांचे कुटुंबच असते’, हा मारलेला टोमणा फक्त औटी यांनाच होता असे नव्हे. हा टोमणा सुजित झावरे यांनाही होता. झावरे यांच्या कार्यक्रमातील व्यासपीठ आठवले तर लंके यांचे बोलणे झावरे यांच्यासाठीही लागू पडतेच! समाज हेच कुटुंब असे बोलणे ठिक असले तरी त्याला कृतीची जोड आवश्यक असते.
लंके यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेला कालचा वर्ग हा फक्त सेनेतील एक गट नव्हता तर सर्वच राजकीय पक्षांमधील कार्यकर्त्यांचा त्यात भरणा होता हेही लक्षात घेतले पाहिजे. बहुतांश नेत्यांकडून आपला फक्त वापरच होतोय आणि वेळोवेळी पानउताराच होत असेल तर तिसरा पर्याय निवडण्यास काय हरकत आहे, अशाच काहीशा भावना कालच्या मेळाव्यातील चेहर्‍यांवर दिसत होत्या. या भावना का तयार झाल्या आणि कोणी तयार केल्या याचे आत्मपरीक्षण सर्वच कथीत नेत्यांनी आणि नेतृत्वांनी करण्याची गरज आहे. तसे झाले तरच परिवर्तनाचे हे वारे थोपविले जाऊ शकते नसता पारनेरमध्ये ‘बच्चू कडू’ तयार झालाच म्हणून समजा! 

No comments:

Post a Comment